निराशेनं चहूबाजूंनी घेरलं की त्या आवर्तात सापडलेला जीव असाच हल्लक होऊन जातो. आपल्या माणसांपासून, समाजापासून तुटत जातो; एवढंच नाही तो स्वतःपासूनही वेगळा होत जातो. आपलाच देह, आपलाच जीव त्याला भार वाटू लागतो, अन् एका क्षणी मिटवून टाकतो, तो आपलं अस्तित्व... निराशेनं ग्रासण्याच्या आणि तिनं मिटवून टाकण्याच्या या टप्प्यात कुणाचा आश्वासक हात हाती आला तर... मग क्काय, एक दुखरं मन पुन्हा सावरेल. झुरणीला लागलेलं फूल पुन्हा तरतरी धरेल.