खरंतर अशी मंडळी अत्यंत हुशार असतात आणि त्यांच्या करियरचा ग्राफ उंच जाऊ शकतो, हे सोदाहरण दाखवून दिलंय, जे निश्चितपणे अनुकरणीयच आहे. कारण अशी मंडळी आयुष्यात काय भोगतात आणि यशोशिखरे का आणि कशी गाठू शकतात, याचं वास्तववादी चित्रण जुन्या-नव्या पिढीपुढे विस्तृतपणे चितारलं आहे. त्यामुळेच सिनेमा बघितल्यानंतर प्रेक्षक फक्त आणि फक्त सकारात्मक विचार मनामध्ये घेऊनच दिग्दर्शकाला दुवा देत बाहेर पडतात. हा सिनेमा कालच्या, आजच्या आणि उद्याच्याही पिढीसाठी एक 'आय ओपनर' ठरतो. कारण यातील विषय समाजातील प्रत्येक स्तरातील विचारांचा थेट वेध घेणारा आहे.
दिग्दर्शकाने आजच्या तरुणाईला नजरेसमोर ठेऊन, इंजिनियरिंग कॉलेज, होस्टेल मधलं जीवन, गॉसिपिंग, जगण्या-मरणाच्या आणाभाका, कॅम्पसमधील चेष्टा-मस्करी, खोड्या, करामती आणि एकुणात अशी धमाल-मस्ती याचं सुंदर सादरीकरण केलंय. ही मजा कोणीही आणि कधीही विसरू शकतच नाही, विसरतही नाही. किंबहुना हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अनमोल ठेवाच असतो. दिग्दर्शकाने अशा फॉरमॅटमधे प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यश मिळवलं आहे. आणि त्यानंतर कथानकाच्या माध्यमातून सर्वांचं प्रबोधन करण्याचं काम अत्यंत हुशारीने केलंय.
भौतिक सुखाच्या मागे लागण्याने उद्भवणाऱ्या अडचणी, आईवडिलांचा किंचित विचार न विचार करून त्यांच्यापासून नकळतपणे दूर जाणारी मुलं आणि त्यांच्या जाण्याने वेदना सहन करणाऱ्या आईवडिलांच्या भावना हे सारं काही वास्तवतेच्या स्तरावर मांडलं आहे. समाजाच्या नकारात्मक भूमिकांना सकारात्मक दिशा दिली असल्याने प्रेक्षक खुर्चीला खिळूनच राहतात.