"शिवाजी महाराजांच्या" इतिहासाने प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अभिमानाचा पूर येतो. मोजक्या मावळ्यांच्या साह्याने मुघल, आदिलशाही आणि कुतुबशाहीशी लढा देत, इंग्रज, पोर्तुगीज आणि फ्रेंच यांच्याशीही मुकाबला करत अवघ्या तीन चार दशकांत स्वराज्याच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास अलौकिक आहे. आणि या यशात सामील होते अनेक शूरवीरांचे शौर्य आणि बलिदान. त्यामुळे शिवाजी महाराजांपुढे आजही प्रत्येक मराठी माणूस नतमस्तक होतोच आणि या नरवीरांपुढेही मान तुकवतो. यामुळेच या देदीप्यमान इतिहासाला रुपेरी पडद्यावर न्याय देण्यास अनेकजण प्रयत्न करीत असतात. फर्जंद हा तसाच एक प्रयत्न दिसतो. अवघ्या साठ मावळ्यांसह आदिलशाहीच्या ताब्यात असलेला पन्हाळगड पुन्हा स्वराज्यात सामील करण्यासाठी कोंडाजी फर्जंद याने बजावलेले शौर्य यात आहे.