"भाई व्यक्ती की वल्ली "
काल पु लं वर आधारित चित्रपट पाहिला, मस्त ! फारच सुरेख !
पु लं - एक आख्यायिका ! पु लं चे योगदान इतके आहे की पटकथा लिहिताना मतकरींनां किती वेचू किती नको झालं असणार.
महाराष्ट्रातल्या अत्यंत लाडक्या व्यक्तिमत्वाला , आणि त्यांच्या उत्तुंग कारकिर्दीला अडीच तासात अगदी बरोबर सुंदर रीतीने सादर करणे सोपी गोष्ट नाही. महेश मांजरेकरांना खरोखर सलाम !
त्यांनी निवडलेली सगळी पात्रं पण अगदी बरोबर ! सगळ्यांनी खूपच जबदारीने आपल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत.
सागर देशमुखांनी खूप सहज रित्या पुलं साकारलेत. खरंच खूप कौतुकास्पद आहे.
सुनीताबाई यांची प्रमुख भूमिका रंगवणारी अभिनेत्री इरावती हर्षे हीने अभिनय नक्कीच छान केला आहे. पण का कोण जाणे ती सुनीताबाई नाही वाटंत. जितक्या शुभांगी दामले ( म्हातारपणीच्या सुनीताबाई) परफेक्ट सुनीताबाई वाटतात.
चित्रपटाचा ओघ जरा खासगी वाटतो. साहित्या विषयी अजून असावे (असेल कदाचित दुसर्या भागात.) त्यांना ज्या ज्या व्यक्ती भेटल्या त्यावर त्यांनी वल्ली साकारल्यात. त्याचा प्रत्यय आला.
चित्रपट पाहताना मध्यंतर कधी झाला, चित्रपट कधी संपला याचे भानच आपल्याला राहत नाही, इतके आपण गुंग होतो.
शेवटच्या 10 -15 मिनिटांत कुमारजी, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे या त्रयींची जुगलबंदी, आणि साथीला पुलं. - आहा ! खूप सुखावह वाटते. अगदी आनंदाश्रू येतात. या आनंदात रममाण झाले असताना प्रत्यक्ष पु लं पडद्यावर येतात आणि *टाईम प्लीज* म्हणत फेब्रुवारीत प्रदर्शित होणाऱ्या दुसऱ्या भागाचे निमंत्रण देतात. आणि तेव्हा कळतं अरेच्चा! संपला की चित्रपट !
आणि हसंत हसंत बाहेत पडणारे तुमच्या-माझ्या सारखे पुलं भक्त लगेच मनात नोंद करतात, पुढील भाग पाहण्याची ईर्षा दर्शवतात.
खूपच छान ! "भाई" चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मानाचा सलाम!
© -वैजयंती जोशी