खरं खोटं किंवा सत्य असत्य या पैकी कशाचीही पुष्टी न करणारा, परंतु भरपुर विचार करावयास लावणारा एक चित्रपट पाहण्यात आला. त्याचं नाव आहे "ताश्कंत फाईल्स".
आपल्याला लहानपणापासून जे काही शिकवलं जातं किंवा आपल्या मनावर जे काही बिंबवलं जातं तेच आपण सत्य मानतो. असंच काहीसं आपल्या बाबतीत काही जुन्या घटनांबद्दल होतं. तसं पाहिलं तर ना सत्य जाणण्याची आपली इच्छाशक्ती नसते आणि ना पचवण्याची कुवत.
हा चित्रपट बऱ्याच न ऐकलेल्या गोष्टी सांगून जातो. आत्ता ते खरं मानावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु हल्लीच्या whatsapp युगामध्ये आपला चांगलाच ब्रेनवॉश झालेला असतो. आणि त्यामुळे जे दाखवलंय ते सत्य असावं असं मन म्हणतं.
हा चित्रपट त्या काळाचं वास्तव समोर आणतो ज्या काळी आपल्या पैकी बऱ्याच जणांचा जन्म देखील झाला नव्हता. त्यामुळे काही लोकांना संदर्भ माहीत नसावा. परंतु दिग्दर्शक याची पुरेपूर काळजी घेतो. एक एक पुरावे ठराविक वेळानं आपल्या समोर येतात आणि आपण ह्या स्टोरी मध्ये गुंतत जातो. दिग्दर्शकाने controversy च्या दोन्ही बाजू अप्रतिम रीत्या मांडल्या आहेत. पण विशेष म्हणजे पुढील दोन मुद्दे. एक म्हणजे जगातील सर्वात मोठया लोकशाहीच्या दुसऱ्या पंतप्रधान यांच्या मृत्यूनंतर साधं पोस्टमॉर्टेम न केलं जावं, ते देखिल मृत्यू देशाबाहेर संशयास्पद स्थितीत झाला असताना. आणि दुसरा मुद्दा असा की त्यांचे दोन medical reports कसे.
संपूर्ण चित्रपट ह्या भोवती फिरतो आणि शेवटी एका हाय प्रोफाईल माजी पंतप्रधान यांच्या कडे नामनिर्देश करतो. पण आपली आजवरची शिकवण आपल्याच मनाशी युद्धं छेडतं, आणि खरं काय खोटं काय हा विचार करत चित्रपट संपतो.
शेवटी मन इतकंच म्हणतं की घडलेलं बदलता येत नाही पण कमीत कमी सत्य जगासमोर आलं तर एका पवित्र आत्म्यास शांती लाभेल आणि ती लाभो हीच सदिच्छा.