कालच चित्रपट पाहिला. मी पुस्तक वाचलेले नाही. त्यांच्याविषयी खूप ऐकून मात्र होतो. खरोखर थक्क करणारा प्रवास आहे. खूप काही शिकण्यासारखे आहे. शालेय वयातील मुलांना तर आवर्जून दाखवण्यासारखा आहे हा चित्रपट. सव्वाशे वर्षांपूर्वी धार्मिक रूढीरीतींचा जबरदस्त पगडा असलेल्या भारतातील महिलेने वयाच्या केवळ बाविसाव्या वर्षी अमेरिकतील कॉलेजमधून डॉक्टर होणे. किती आव्हाने त्यांनी पार केली आहेत याची कल्पना येते. सलाम त्या जिद्दीला.
चित्रपटाविषयी:
सकारात्मक:
तत्कालीन काळ उभा करण्यात चित्रपट खूपच यशस्वी झालाय. वरच्या अनेक प्रतिक्रियांमध्येसुद्धा हा मुद्दा आला आहेच. छोट्या छोट्या तपशिलांची काळजी घेतली आहे. अंगावर शहारे आणणारे, धक्कादायक, दु:ख दायक प्रसंग खूप प्रभावी चित्रण केले आहे. अमेरिकेला जातानाचे दृश्य आणि तेंव्हाची गोपाळरावांची आर्त हाक! फारच परिणामकारक. तिकीट काढून जहाजातून जाणे बस्स इतकेच. बघताना कसे अगदी अगदी होते. सेक्युरिटी नाही, चेक इन नाही, ब्यागेज नाही, गर्दी नाही, वेटिंग नाही, क्यू नाही, अनौंसमेन्ट नाहीत. आजच्या काळात अपरिहार्य वाटणाऱ्या गोष्टी. पण नंतर लक्षात येते कि अरे या सगळ्याची वास्तविक पाहता तशी मुलभूत गरज नाहीच. कित्ती साधे सोपे सरळ होते सगळे Happy आजकाल तळ्यात बोटिंग करणे सुद्धा इतके साधे राहिले नाही.
नकारात्मक:
डॉक्युमेंटरी स्टाईलकडे झुकला आहे. त्यामुळे मुलांसाठी नाही म्हटले तरी थोडा कंटाळवाणा होतोच.
शेवटच्या प्रसंगातला विद्यापीठातला गोपाळरावांचा प्रवेश मला व्यक्तीश: फारच फिल्मी वाटला. अगदीच "बच्चन स्टाईल एन्ट्री" असे वाटले.
एकंदर: सर्वांनी एकदातरी नक्की पहावा असा चित्रपट.